संदीप टुले
Health News : दौंड : सद्यस्थितीत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. बाह्यरुग्ण विभागात याचे प्रमाण जास्त असून, शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात डोळ्यांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही विषाणूजन्य साथ असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.(Health News)
डोळ्यांची काळजी कशी घ्यायची.
डोळ्यांची आग होणे, पापण्या सुजणे, डोळ्यांमध्ये खडे खुपसल्यासारखे होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे किंवा डोळे चिपडणे यासोबत सर्दी, ताप आणि खोकला ही लक्षणे सुद्धा आढळत आहेत. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल गोंधळलेल्या प्रत्येकासाठी, डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही सोप्या आणि अतिशय व्यावहारिक पद्धती आहेत. पण ग्रामीण भागातील नागरिकांना याबद्दल माहिती नसल्यामुळे सध्या त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.(Health News)
आरोग्य विभागाने याची खबरदारी घेत याकडे गांभीर्याने लक्ष देणेही गरजेचे असून, यामध्ये जनजागृती ही महत्वाची आहे. सहसा हा डोळ्यांच्या साथीचा आजार पाच ते सात दिवसांमध्ये आटोक्यात येऊ शकतो. पण डोळ्यांच्या संसर्गामुळे नागरिक जास्तच गोंधळून जात आहेत.(Health News)
काय घ्यावी काळजी?
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साथीने पसरणारा रोग असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगळे ठेवावे.
– संसर्ग झालेल्या लोकांनी बाहेर ठिकाणी जाणे टाळावे.
– रुग्णांचे कपडे, रुमाल, नॅपकीन व टॅावेल वेगळे ठेवावे व धुवावे. वारंवार डोळ्यांना हात लावू नये. डोळे चोळू नये.
– संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रखर प्रकाश टाळून गॅागल वापरावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य औषधोपचार करावा.
– स्वतः किंवा इतरांकडून उपचार करू नयेत व घरगुती उपाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नयेत.
– संसर्ग झालेल्या व्यक्तीने मोबाईल अथवा टीव्ही पाहणे टाळावे.(Health News)