School News लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासुन पूर्व हवेलीमधील प्राथमिक व माध्यमिक विभाग सपशेल ‘फेल’ झाल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यमांच्या शाळांच्या प्रमानेच पुर्व हवेलीमधील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता देखील चर्चा करण्याच्याही पलीकडे गेली असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे. मराठी माध्यमाप्रमानेच शासकीय पातळीवरुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता तपासणी होण्याची गरज असुन, पालकांनीही शाळांच्या दर्जा तपासणीसाठी आग्रह धरण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. (School News)
पुर्व हवेलीत साठहुन अधिक छोट्या-मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असुन, या शाळात पालक वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून चांगले शिक्षण विकत घेतल्याचे समाधान मिळवत असतात. मात्र, वरकरणी रंगरंगोटी केलेले वर्ग, मुलांना झकपक ड्रेस, बूट, सॉक्स, टाय, स्कूल बॅग, वॉटरबॅग अशा ‘सो कॉल्ड’ भौतिक वातावरणात वावरणाऱ्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी कोणतीही शासकीय फुटपट्टी नसल्याने बहुतांश शाळाचा क्षैसणिक दर्जा गुलदस्त्यात राहतो आहे. यामुळे पुर्व हवेलीमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाकली मुठ सव्वा लाखाची या न्यायाने आपल्याच गुर्मीत वावरत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. (School News)
पुर्व हवेलीमधील पालकांकडून मिळणाऱ्या प्रचंड पैशांतून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची लाखोंची कमाई दरवर्षी होत आहे. यातून त्यांच्या टोलेजंग इमारती, इतर भौतिक सुविधा निर्माण झाल्या आहेत. या सुविधा पाहून पालक सुखावतात. मात्र, वारेमाप पैसा खर्च करूनही शिक्षणाच्या दर्जाचे काय? आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का? मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत काय सुधारणा होते? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात, हे कटू सत्य आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर शाळा शिक्षकांना राबवून घेतात. इंग्रजी माध्यमाच्या कायम विनानुदानित शाळा शिक्षकांच्या शोषणाचे अड्डे बनल्या आहेत. (School News)
इंग्रजी शाळांना चांगले शिक्षक मिळेना
ग्रामीण भागातील इंग्लिश शाळांना चांगले शिक्षक मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना पुढे फक्त आणि फक्त ‘एक्झिक्युटिव्ह’ व्हायचे असते. त्यांच्यासमोर चांगला शिक्षक होणे हे उद्दिष्ट कधीच नसते. चुकून चांगले शिक्षक मिळाले तर ते तुटपूंज्या पगारावर फार दिवस टिकत नाहीत. ते स्टेशनवर उभे राहिल्यासारखे शाळेत थांबतात. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की ते निघून जातात. त्यामुळे शिक्षकांचे येणे-जाणे, नोकर्या सोडणे-धरणे नित्याचे झाले आहे. (School News)
वर्षभरात वर्गाला चार-चार शिक्षक होतात. परिणामी, इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा चांगल्या शिक्षकांच्या शोधात असतात, आहेत. मग अशी दैना असेल तर तेथे या जागरूक पालकांच्या मुलांना ‘चांगले’ शिकवणार तरी कोण? ही वस्तुस्थिती विचारात घेतली तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. (School News)
…पण आपल्या पाल्याला ‘चांगलं’ शिकवायचं
सरकारी शाळांनी शे-दोनशेची देणगी मागितली तर एकीकडे का-कू करणारे पालक, दुसरीकडे मात्र इंग्लिश शाळांच्या मागणीप्रमाणे डोनेशनसाठी पैसे काढून देतात हा विरोधाभास दिसुन येत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, हे काही कळत नाही. यातला एक भाग असाही दिसतो, की ग्रामीण भागातील ज्या पालकांची पहिली पिढी शिकलेली आहे, शिकलेली म्हणजे अल्पशिक्षित, अर्धसाक्षर. त्यातीलच अनेकजण पुढे कर्तेधर्ते झाले. (School News)
सुधारित शेती, लहानमोठा व्यवसाय करू लागले. त्यातून त्यांच्याकडे थोडाफार पैसा आला. बाकी बहुसंख्य लोकांच्या घरात तर शिक्षणाची परंपराच नाही, त्यांना इंग्रजीची तर गंधवार्ताच नाही. आपल्याला नाही शिकता आले, पण आपल्या पाल्याला ‘चांगले’ शिकवायचे…आणि हे चांगले शिक्षण जणू फक्त केवळ इंग्लिश शाळांतून मिळते, असा पक्का ‘समज’ त्या मंडळींनी करून घेतल्याचे स्पष्टपणाने दिसते. कुटुंबातील वातावरण पूर्णपणे ग्रामीण मराठी वळणाचे असले तरी त्यांच्याशी इंग्लिशमधून कोण आणि कसे बोलणार? हे प्रश्न पालकांना अजिबात पडत नाहीत. (School News)
नावं मोठं अन् ‘लक्षण’…
मुले एकदा का तिकडच्या शाळेत घातली की झकपक ड्रेस, बूट, सॉक्स, टाय, स्कूल- बॅग, वाटरबॅग…केवढी मिजास असते त्या मुलांची! गावोगावी फिरणार्या स्कूल बसमधून ही टाईट-फाईट ‘लुक’मधली मुले जेव्हा ‘हाय…हॅलो…गुड मॉर्निंग…गुड बाय…’ असे म्हणू लागतात तेव्हा त्यांचे पालक मनोमन सुखावतात! तिथली सैनिकी पद्धतीची शिस्त…बसायला बाके…भव्य इमारती…इतकेच नाही तर ‘पॅरेंट डे’ ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे…’ आणि ‘अॅन्युअल डे’चा तो ‘कल्चरल प्रोग्राम’ म्हणजे तर केवढे ‘ग्रेट, ग्रँड सेलिब्रेशन’ असते!
तिथला तो चमचमाट, पालकांच्या खर्चातून आणलेली रंगीबेरंगी ड्रेपरी. कोरिओग्राफरच्या नजरेच्या इशाऱ्यावर आणि एखाद्या ढाकचिक…ढाकचिक गाण्याच्या तालावर मुले जेव्हा स्टेजवर येऊन नाचू लागतात, तेव्हा पालकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटू लागते. मात्र या पाल्यांना शिक्षण चांगले मिळते का याची मात्र माहिती पालकांना मिळत नाही. व पालकही ती माहिती गोळा करण्याच्या फंदात पडत हे वास्तव आहे. (School News)
दरम्यान, पुर्व हवेलीमधील सर्वच गावातील सजग पालकांची मुले इंग्लिश मीडियमला गेल्यामुळे त्यांनी, आपआपल्या गावातल्या शाळेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या शाळेवर नैतिक दबाव ठेवण्याची संधीही त्यांनी आपल्या हाताने गमावली आहे. (School News)