Scholarship News लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात हवेली तालुक्यातील प्राथमिक विभाग सपशेल फेल झाल्याने चौफेर टीका होत असतानाच, माध्यमिक विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर ढासळल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या आठवीतील ३ हजार ६५३ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या ३३ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत परंपरेप्रमाणे शिरूर, आंबेगाव आणि खेड तालुकेच यंदाही अव्वल ठरले आहेत. (Scholarship News)
केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची ‘पाटील’की कारणीभूत ; वरिष्ठ शिक्षकांचा थेट निशाना
हवेली तालुक्यात माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी सुसज्ज इमारती, सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा, पोषक शैक्षणिक वातावरण असतानाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मागील काही दिवसांपूर्वी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात प्राथमिक व माध्यमिक विभागही तोंडावर आपटल्याचे चित्र आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे अपयश नसून, हवेली तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पिछेहाट असल्याची संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (Scholarship News)
दरम्यान, हवेली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी तसेच प्राथमिक शाळांचे काही केंद्रप्रमुख कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप प्राथमिक शाळांतील काही वरीष्ठ शिक्षकांनी “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना केला. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट केंद्रप्रमुखांपर्यंत जागेवर बसून “पाटील”की करत असल्यानेच, शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात हवेली तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभाग तोंडावर आपटल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी आपापली कार्यालये सोडून, वेळोवेळी शाळेत जाऊन झाडाझडती घेतल्यास, पुढील वर्षी तरी हवेली तालुका प्रगतीपथावर येईल, असा विश्वास हवेली तालुक्यातील वरिष्ठ शिक्षकांनी व्यक्त केला आहे. (Scholarship News)
प्राथमिक विभाग शिष्यवृत्ती परीक्षेपाठोपाठ माध्यमिक विभागाच्या गुणवत्ता यादीत नेहमीप्रमाणे शिरुर, खेड व आंबेगाव तालुक्यांनी बाजी मारली असून, जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा विचार करता हवेली तालुका गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळेमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, उत्तम शिक्षक असतानाही सातवा क्रमांक येणे ही बाब हवेली तालुक्यातील राजकारणी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांसाठी लाजिरवाणी बाब आहे. (Scholarship News)
नियम मोडणाऱ्या शिक्षकांवर कारवाई कधी?
पूर्व हवेलीमधील अपवाद वगळता अनेक शाळांमध्ये शासनाने दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिरा शिक्षक शाळेत हजेरी लावत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. शिक्षक येईपर्यंत काही विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसलेले दिसतात. शिक्षक उशिरा आले तरी त्यांची नोंद कुठेही होत नाही. प्रशिक्षण, केंद्र प्रमुखांचे काम करतो, अशी कारणे देत काही शिक्षक शाळा सोडून इतरत्र भटकत असल्याचे चित्र पूर्व हवेलीत मागील काही वर्षांपासून अनुभवास येत आहे. लोणी काळभोर हद्दीतील एक शिक्षक तर कामचुकारपणाबाबत बदनाम झाले आहेत. पण आपण काळभोरांचे पाहुणे असल्याने, कारवाई होऊच शकत नाही, या मग्रुरीत राहत असल्याची तक्रार होत आहे. कामचुकार अधिकारी व शिक्षकांमुळे हवेली तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालल्याचे निदर्शनास येत आहे. (Scholarship News)