केडगाव / गणेश सुळ : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या मंदिरात रविवारी रात्री दहा वाजल्यापासून अमावास्येचा पर्वकाळ असल्याने जेजुरीत सोमवती यात्रा भरली. जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा या सोमवती अमावस्येला भरत असते. या यात्रेला कालपासूनच राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून, २ ते ३ लाख भाविक जेजुरीत दाखल झाले होते.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे तर परराज्यातून हजारो भाविक, नित्य वारकरी जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले होते. आज दुपारी एक वाजता खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडावरून पालखीचे प्रस्थान झाले.
भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने हा पालखी सोहळा सुरू झाला. हा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला असून, या ठिकाणी उत्सवमुर्तींना मान्यवरांच्या हस्ते स्नान घालण्यात आले. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून बालदरित देवाच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या.
सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या क्षणाला भंडारा खोबऱ्याची मुक्त हाताने उडवतं मोठ्या उत्साहाने खंडोबाचं नाव घेतात. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी भाविक मोठ्या आंनदाने हा क्षण साजरी करत होते.
खंडोबारायाच्या जेजुरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा साजरी केली जाते. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झालेले पाहायला मिळत होते.