पुणे : व्यवसायामध्ये भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी एका उद्योजकाने पत्नीची अघोरी पूजा करुन मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला चक्क सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिलेचा पती, सासरे, सासु आणि मांत्रिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे २०१३ मध्ये लग्न झालं होतं. फिर्यादीचा पती हा उद्योजक असून एका प्रायव्हेटल लिमिटेडचा संचालक आहे. त्याची पत्नीदेखील या कंपनीमध्ये संचालक आहे. आपल्या व्यवसायामध्य भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी पती उद्योजक एका मांत्रिकाकडे गेला. त्यानंतर त्या उद्योजकाने सातत्याने शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वारंवार मारहाण करणं आणि शिवीगाळही करीत होता. तसेच माहेरच्यांनी दिलेल्या सोन्याचे, हिऱ्याचे आणि चांदीच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला.
तसेच महिलेच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्र गहाण ठेवून त्यावर ७५ लाख रुपयांच कर्जही घेण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वेळोवेळी मारहाण करुन व्यवसायासाठी आतापर्यंत १ ते २ कोटी रुपये घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यानंतर मांत्रिक मौलाना बाबा जमादार याने पीडित महिलेची अघोरी पूजा केली.
दरम्यान, पती, सासू, सासरे यांनी भानामती नाहीशी व्हावी व मुलगा व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पतीने पत्नीला रायगड इथं नेलं, तिथे पुन्हा पूजा करुन तिला सर्वांसमक्ष नग्न होऊन अंघोळ करायला लावली. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्याविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.