Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (ता. १५) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. (Uruli Kanchan News)
संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्या भावांनी मागील पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केला होता. यामुळे संपूर्ण गाव हादरले असून, या घटनेचा निषेध म्हणून गावातील युवकांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. १४) हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात मूक मोर्चा काढला होता. मूक मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलिस दूरक्षेत्र उरुळी कांचन येथे येऊन आक्रमक मागणी करुन पोलिसांना निवेदन देण्यात आले. संबंधित पीडित युवतीला न्याय मिळावा मुख्य आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली. (Uruli Kanchan News)
बलात्काराच्या आरोपात अटक केलेला दोघा आरोपींना पोक्सो अंतर्गत कारवाई करुन आरोपींना शिक्षेपर्यंत कारवाईची प्रक्रिया करावी अशी आक्रमक मागणी मोर्चेकरांनी व्यक्त केली. यावेळी घटनेचा निषेध म्हणून उरुळी कांचन शहर शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनासमोर घेतला आहे. तसेच यावेळी गावातील सर्व व्यवहार, दुकाने, व्यवसाय, छोटे-मोठे उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय गावातील नागरिकांनी घेतला आहे.(Uruli Kanchan News)
दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शनिवारी एक दिवस गाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन पुणे शहर अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र.५ विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांना देण्यात आले.(Uruli Kanchan News)
शाळा, महाविद्यालये सुरु राहणार..
उरुळी कांचन गाव बंद असले तरी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालय सुरूच राहणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय सेवा, सार्वजनिक परिवहन सेवा या सुरळीत सुरू राहणार आहेत.(Uruli Kanchan News)
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “उरुळी कांचन भागात घडलेली घटना हि दुर्दैवी आहे. या घटनेमुळे गावातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व गाव बंद राहणार आहे. याबाबतचे निवेदन गावच्या वतीने पुणे शहर पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण गाव बंद राहणार असून या बंदला संपूर्ण गावाने पाठींबा दिला आहे. त्यामुळे उरुळी कांचन एक दिवस बंद राहणार आहे.”