Pune News : पुणे : अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, आज अधिकृत घोषणा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर शरद पवार गटाचा नवा चेहरा म्हणून शरद पवार यांच्या निकटवर्ती समजले जाणारे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. रोहित यांची शरद पवार यांना मिळत असलेली साथ लक्षात घेता रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे युवा नेतृत्व म्हणून पुढे आणण्यात येत आहे, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रोहित पवार शरद पवार गटाचा नवा चेहरा?
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीमध्ये नवे नेत्रुत्व तयार होईल अशी घोषणा केली होती. हे नवे नेत्रुत्व म्हणजे रोहित पवारच असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. अजित पवार यांनी बंड केल्याचे कळताच रोहित पवार तातडीने पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. (Pune News ) या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देखील शरद पवार यांनी रोहित यांना जवळ बसण्याची सूचना केली. शरद पवार कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असतानाही रोहित पवार त्यांच्यासोबत होते. यामुळे भविष्यातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.
रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. २०१७ मध्ये त्यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते पक्षात सक्रिय झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. (Pune News ) ऑक्टोबर २०१९ मध्ये ते नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून १३५८२४ मतांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार हे पवार घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती आहेत, जे राजकीय पदावर आहेत.
शरद पवार यांचे राजकीय वारसदार खासदार सुप्रिया सुळे की अजित पवार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता रोहित पवार यांचेही नाव पुढे येत आहे. (Pune News ) शरद पवार यांच्यामुळेच राजकारणात आल्याचे रोहित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आगामी काळातील युवा नेतृत्व असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.