लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार वहातुक पोलिसांना मिळालेले वसुलीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी, शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने पुणे-सोलापुर महामार्गावर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यानच्या रस्त्यावर 24*7 म्हणजेच आठवड्यातील सात दिवस व एका दिवसातील चोवीस तासही अशी नॉनस्टॉप वसुली सुरु केली आहे. वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वहातुक नियमन की वसुली हाच प्रश्न या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सतावु लागला आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान फुरसुंगी फाटा, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी व नायगाव फाटा, व उरुळी कांचन हद्दीतील एलाईट चौक व तळवाडी चौक अशा सात ठिकाणी वहातुकीची कोंडी सतत जाणवत आहे. मात्र वाहतूक विभागातील पोलिस वरील चौकातील वहातुक कोंडी दुर करण्याऐवजी, या चौकातुन ये-जा करणाऱ्याकडुन वसुलीचे काम करत असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वहातुक पोलिसांचे नेमके वसुली की वहातुक नियमन असा प्रश्न उभा राहिला आहे. याबाबत या भागातील खासदार, आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मुग गिळुन गप्प बसल्याने, पोलिसांच्या पठाणी वसुलीचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसु लागला आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावरील मांजरी हद्दीत फुरसुंगी फाटा, कदमवाकवस्ती येथील कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस ऑनलाईन दंड व पावत्या फाडण्यात दंग आहेत. त्यामुळे सोलापूर, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
वाहतूक पोलिसांकडून पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन, लोणी काळभोर, थेऊर फाटा व उरुळी कांचन येथील तळवाडी चौक या ठिकाणी दररोज सर्रासपणे वसुली सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरची कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी ठरलेली शंभर अथवा दोनशे रुपयांची पावती फाडत आहेत. वहातुक पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे शेतकरी, कामगार तसेच शहरात रोजगार मिळवण्यासाठी जाणाऱ्या लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.
गरीब वाहनधारकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीच चुक नसताना हा आर्थीक फटका नाहक सहन करावा लागत आहे.
लोणी काळभोर उरुळी कांचन येथील सर्वसामान्य नागरिकानां कामानिमित्त बाहेर पडावे लागते. अशा सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच मागुन त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारण्यात येत आहे. दंड जरी लगेच द्यावा नाही लागला तरी भविष्यात हा दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना हा आर्थीक फटका बसत आहे.
लोणीस्टेशन व उरुळी कांचन हद्दीत रस्त्यावर वहाने उभे करणारे पोलिसांचे पाहुणे का ?
पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) येथील कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक दरम्यान वाहनचालक रस्त्यावरच गाड्या लावतात. या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करताना आढळून येत नाहीत. लोणी स्टेशन चौक, कुंजीरवाडी गाव व उरुळी कांचन हद्दीतरस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमानात वहाने उभी असतात. अशा वाहनांच्यावर कारवाई तर दुरच, पोलिस साधे हटकतही नसल्याचे दिसुन येत आहे. वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी यात दुमत नाही मात्र, इतरांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.