Pune News : जगातील सात आश्चर्ये पाहण्याची इच्छा आहे? पण जगातील विविध देशांमध्ये जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत आणि वेळही नाही, बरोबर ना? मग आता काळजी करायची गरज नाही. ही सर्व आश्चर्ये तुम्ही पुण्यात ती देखील एकाच ठिकणी पाहू शकता. आश्चर्य वाटलं ना? हो, पण हे अगदी शंभर टक्के खरं आहे. पुण्यातील सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कमध्ये तुम्हाला या सात आश्चर्यांचा अनुभव घेता येईल.(Pune News)
जगातील सात आश्चर्ये पाहण्याची इच्छा आहे?
समाजसेवक आबा बागुल यांनी २०११ मध्ये पुण्यामध्ये याची सुरुवात केली. या सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कमध्ये जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती आहेत. ताजमहाल, कोलोझियम, पिसाचा झुकता मनोरा, स्टोनहेज, ग्रेट पिरामिड, आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे सर्व एकाच ठिकाणी तुम्ही पाहू शकता. (Pune News)अत्यंत सुंदर असलेले हे पार्क वर्षभर रंगीबेरंगी फुलांनी नटलेले असते. या रंगीबेरंगी फुलांवर विविध प्रजातींची अनेक फुलपाखरे आणि पक्षी विश्रांती घेताना पाहायला मिळतात. या पार्कचे नाव यशवंतराव चव्हाण उद्यान असे आहे. मात्र, आजूबाजूचे स्थानिक नागरिक या ठिकाणाला “आबा बागूल उद्यान” या नावाने ओळखतात.(Pune News)
जगातील सात आश्चर्ये या पृथ्वीवरील अद्भुत अशा वास्तुकला आहेत. या वास्तुकला पाहण्याची सर्वांनाच इच्छा असते. या वास्तुकला पाहायच्या असतील तर जगातील विविध देशामध्ये जावं लागतं. परंतु पैसा आणि वेळेअभावी हे बघणं शक्य होत नाही. यासाठीच आबा बागुल यांनी या सर्व वास्तुकला तुम्हाला पुण्यामध्ये एकाच ठिकाणी पाहायला मिळण्याची व्यवस्था केली आहे. अनेक लोक येथे येऊन हा अनोखा नजारा पाहण्याचा आनंद घेत आहेत, असे सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कचे व्यवस्थापक सुनिल सन्स यांनी सांगितले.(Pune News)
या पार्कमध्ये असलेले विविध सुपरहिरोंचे कटआऊट मुलांचे लक्ष वेधून घेतात. लघुचित्रांभोवतीचे दिवे सायंकाळच्या वेळी सुरू होतात, त्यामुळे प्रतिकृती डोळ्यांना अधिकच सुखावणाऱ्या भासतात.(Pune News)
कुठे पाहाल?
पुण्यातील सहकारनगर परिसरात सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क आहे. हा स्वारगेट चौकाजवळ, राजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंगच्या समोर आहे. सकाळी ६ ते १० तसेच दुपारी ४ ते ८ या वेळात तुम्ही पाहू शकता. गार्डनला भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क आहे, ज्यामध्ये ४ डी शोचाही समावेश आहे.(Pune News)