संदीप टुले
Kedgav News दौंड : चौफुला परिसर नेहमीच गजबजलेला पाहायला मिळतो. येथील उद्योगधंदे, मिळणाऱ्या सोयीसुविधा हे यामागचे कारण आहे. (Kedgav News) त्यात सध्या सुट्टीचा काळ संपला असून, प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पण चौफुला येथे बस स्थानकच नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होताना दिसत आहे. (Kedgav News)
चौफुला येथे गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकाची सोय नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही ती अद्याप केली नाही. येथे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. पण बसण्याची सोय नाही, पिण्यास पाणी नाही, उन्ह, वारा व पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी येथे साधे शेडही नाही. त्यामुळे येथील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
तसेच येथे बसस्थानकच नसल्याने बस थांबण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी, प्रवाशांना बस थांबवण्यासाठी हात करावा लागत आहे. पण हे करूनही काही मोजक्याच बस थांबतात आणि थांबणारी बसही जागेअभावी या महामार्गावरच थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसमध्ये चढावे लागते.
दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
काही बस या महामार्गावर थांबत असल्याने इतर वाहने वेगाने असतात. त्यामुळे याठिकाणी काही दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन चौफुला येथे बस स्थानकाची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.