गणेश सुळ
Rahu News केडगाव : एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये अवतरले. (Rahu News) यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. (Rahu News)
शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहु या शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले.
विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात ही बालगोपाल अगदी रमली होती.
दरम्यान, या पालखी सोहळ्याचे पुजन राहूचे सरपंच दिलीप देशमुख ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कुंभार ,केंद्रप्रमुख चंद्रकांत केळकर, मुख्याध्यापक शिवदास शिंदे ,महेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राहू गावातून या पालखी सोहळ्याची मिरणवूक काढण्यात आली. राहूचे कुलदैवत शंभू महादेव मंदिरात केंद्रप्रमुख चंद्रकांत केळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी राहूल भुजबळ, हर्षल भटेवरा, ज्ञानेश्वर मेमाणे भरत वाघ यांनी विदयार्थ्यांना खाऊ वाटप केले. त्यानंतर शाळेत गोड जेवण देऊन पालखी सोहळ्याची सांगता झाली.