पुणे : ठाणे, दादर, बोरिवलीवरुन पुण्याकडे धावणाऱ्या शिवनेरी व शिवाई बस मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही बस बंद होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)ने माहिती दिली आहे.
बोरिवली आणि ठाण्याहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या मार्गावरील प्रतिष्ठित शिवनेरी बसऐवजी इलेक्ट्रिक शिवाई बस नेण्याचा विचार करीत आहे. दादर ते पुणे दरम्यान शिवनेरी बस सुरू राहणार आहेत.
सध्या ठाणे बोरिवली आणि दादर येथून पुण्यासाठी सुटणाऱ्या शिवनेरी बस या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाचा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच या बसची लोकप्रियतादेखील वाढली आहे. परंतु ऑक्टोबरपासून ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बस बंद होणार आहेत, त्या ऐवजी प्रवाशांसाठी कमी किमतीच्या मात्र आरामदायी शिवाई बस उपलब्ध होणार आहेत.
150 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे आणि वितरणाचा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. त्यापैकी काही पुणे मार्गावर वापरण्याची योजना आहे. ठाणे ते स्वारगेट, ठाणे ते शिवाई नगर, बोरीवली ते स्वारगेट आणि बोरिवली ते शिवाई नगर या चार मार्गांवर शिवनेरीची मागणी कमी असल्याचे MSRTC चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले
या चार मार्गांवर शिवाई बस सुरू होतील आणि एका तिकिटाची किंमत अंदाजे 350 ते 375 रुपये च्या दरम्यान असेल. सध्या, शिवनेरी बस प्रति प्रवासी 450 रुपये आकारते.
ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या लोकप्रिय मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज सुमारे 25,000 प्रवासी प्रवास करतात आणि त्यापैकी किमान 5,000 MSRTC बस वापरतात.
प्रत्येक प्रवाशासाठी या बसमध्ये रिक्लाईनिंग सीट्स आणि बिल्ट-इन यूएसबी चार्जिंग पॉइंट आहेत. या बसेस सुरळीत प्रवासासाठी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. शिवाई बस केवळ शून्य उत्सर्जनच नव्हे तर शून्य आवाजाचेही पालन करतात, या बसेस जीपीएस उपकरणे, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटणाने सुसज्ज आहेत.