Palkhi Sohla : लोणी काळभोर, (पुणे) : ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पालखीच्या पुढे दिंड्या, पाठीमागे तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सोबतीला आसमंतांत घुमनारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, अशा या वातावरणात लाखो वारकऱ्यांसह पुण्याहून निघालेला जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. १४) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विसावला. (Palkhi Sohla)
कदमवाकवस्ती येथे पालखीचे स्वागत..
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे दर्शन तसेच वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच राजश्री काळभोर, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले. तसेच हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देविदास कदम, विलास कदम, विशाल कदम, सुरेश काळभोर, विशाल गुजर, मित्र परिवाराने पालखीचे स्वागत केले. (Palkhi Sohla)
यावेळी नागरिकांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाका परिसरापासून लोणी काळभोर गावात चालत देखील गेले. तसेच अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण छायाचित्रात बंदिस्त केली. पालखी लोणी स्टेशन चौकात पोहोचताच पालखीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू काळभोर, लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर यांनी केले. लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळ्याने सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावात प्रवेश केला. (Palkhi Sohla)
पालखी सोहळा लोणी काळभोर हद्दीत पोहोचताच लोणी काळभोरचे सरपंच व अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर, उपसरपंच ललिता राजेंद्र काळभोर, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह हजारो लोणी काळभोरच्या भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. लोणी काळभोर गावात पोहोचताच शिवशक्ती भवनजवळ पालखीचे स्वागत साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण काळभोर, ह. भ. प. विनोद महाराज काळभोर यांनी विठ्ठल मंदिराजवळ स्वागत केले. (Palkhi Sohla)
दरम्यान, पालखी सोहळा मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचला. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्यासाठी विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. (Palkhi Sohla)