पुणे : केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान मोठया उत्साहात आज (ता. १५) राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नागरिकांना 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एक दिव्यांग नागरिकाने आपल्या घराच्या 75 पायऱ्या हाताने चढून आपल्या घरावर 75 फुट उंच तिरंगा फडकवला आहे.
रफिक शेख असे दिव्यांग तरुणाचे नाव आहे.
पुण्यात राहणारे रफिक शेख हे जन्मताच दिव्यांग आहेत. रफिक शेख हे व्हीलचेअर शिवाय कुठेही प्रवास करू शकत नाही. मात्र, भारत देशाच्या प्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या घराच्या 75 पायऱ्या चढून 75 फूट उंच तिरंगा फडकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारत वासियांना हर घर तिरंगा या अभियानामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. यालाच प्रतिसाद म्हणून मी हा तिरंगा माझ्या घरावरती फडकवला आहे. असे रफिक शेख यांनी सांगितले आहे.
रफिक शेख पुढे म्हणाले की, हा तिरंगा फडकवण्यासाठी त्यांना अतिशय कष्ट झाले. कारण की 75 पायऱ्या त्यांनी आपल्या हाताने चढल्या आणि तिरंगा फडकवला. मला जो काही 75 पायऱ्या चढण्याचा त्रास झाला तो त्रास जेव्हा माझ्या हातून तिरंगा फडकवला गेला त्यावेळेस तो हळूहळू कमी झाला. तिरंगा फडकवने ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे.
दरम्यान रफिक शेख यांनी सरकारला एक मागणी केली आहे की, दिव्यांगांच्या अनेक समस्या जैसे थे आहेत. आम्हाला देखील समाजामध्ये एक व्यक्ति म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि यासाठी आम्हाला सरकारतर्फे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.