पुणे : शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला २४ टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाने दुसर्या व्यावसायिकाला तब्बल ४ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार १५ जुलै २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे.
अभिजित अप्पासाहेब वठार (वय ४०, रा. ओकवड्स हिल सोसायटी, बाणेर) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित धोंडीबा सावंत (वय ४०, रा. सनसिटी रोड, सिंहगड) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित वठार याला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत तिघांनी वठारविरुद्ध पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत ब्रोकरेजचा व्यवसाय करतात. त्यांची ट्रेडबिझ इंडिया एलएलपी नावाची कंपनी आहे. सावंत यांचे ऑफिस असलेल्या इमारतीत वठारचे देखील कार्यालय आहे. वठार हा एच. आर. एंटरप्राईजेस, फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर ट्रेडिंग आणि रिरायझिंग कन्स्ट्रक्शन या कंपन्यांत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करीत होता. त्यानुसार २०२० मध्ये संग्राम घाडगे या मित्राने सावंत यांना वठारबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. याबाबत माहिती देऊन असंख्य लोकांनी कोट्यवधी रुपये त्याच्याकडे गुंतविल्याचे त्यांना सांगितले. सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून काही बँकेचे व्यवहारसुद्धा दाखवले.
जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त नफा, असे वठारने सूत्र सांगितले. सावंत यांनी प्रलोभनाला बळी पडून वेळोवेळी १ कोटी ७० लाख रुपये ऑनलाईन त्याच्या हवाली केले. त्यानंतर काही दिवसांनी ५० लाख रुपये सावंत यांच्या खात्यावर जमा केले. हा नफा असल्याचे सांगून मूळ रक्कम आपल्याकडे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे सावंत आणखी त्याच्या जाळ्यात अडकत गेले. रोख व कंपनीच्या खात्यातून सावंत यांनी वठार याला ४ कोटी ८८ लाख रुपये दिले. मात्र, ठरल्यानुसार पैसे न देता वठारने परत सावंत यांना गुंतवणूक केलेले पैसे व नफा असा ५ कोटी रुपयांचा कंपनीच्या नावे कोल्हापूर येथील कार्यालयात १७ डिसेंबर २०२० मध्ये गुंतवणूक करारनामा करून दिला.
सावंत यांना विश्वास वाटावा म्हणून वठारने तारखेच्या अगोदरच दिलेला पाच कोटी रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी टाकू नका, कारण कंपनीचे पैसे दुसर्या व्यवसायात अडकल्याचे सांगत होता. सावंत यांनी एकेदिवशी त्याने दिलेले सर्व चेक बँकेत जमा केले. मात्र, खात्यावर पैसे नसल्यामुळे सर्व चेक बाऊन्स झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी वठारसोबत संपर्क केला असता, त्याने तो विदेशात असल्याचे सांगून वेळ मारून नेत होता. मात्र, सावंत यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला असता वठारने ‘मी तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकविल,’ असे सांगितले. सावंत यांनी वेळोवेळी रोख व कंपनीच्या खात्यातून वठारकडे गुंतविलेल्या पैशातून ६२ लाख २५ हजार रुपये परत देऊन ४ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी वठारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, वठारविरुद्ध यापूर्वी चतुःशृंगी व अंबाजोगाई पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने दहा ते पंधरा लोकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.