Railway News | पुणे : मागील एक वर्षात धावत्या रेल्वेची आपतकालीन अलार्म चेन ओढणाऱ्या १ हजार १६४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत या घटना घडल्या आहेत.
रेल्वेने केवळ आपत्कालीन वापरासाठीच रेल्वे गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंगचा पर्याय दिला आहे. मात्र, स्टेशनवर प्रवासी उशीरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर उतरणे, बोर्डिंग इत्यादी किरकोळ कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत आहेत. ट्रेनमधील एसीपीच्या गैरवापरामुळे इतर गाड्यांवरही त्याचा परिणाम होतो.
एसीपीच्या गैरवापरामुळे गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे त्यांच्या समय पालनात अडथळा निर्माण होतो. एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर झाल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. अशा अनुचित एसीपी घटनांवर पुणे रेल्वे विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
प्रवाशांनी अलार्म चेन अनावश्यक ओढू नये, याकरिता सतत उदघोषणा तसेच रेल्वे गाड्यांमध्ये सूचना बोर्ड लावून दुरुपयोग थांबवा, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. अलार्म चेन पुलचा वापर करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.
दरम्यान, प्रवाशांना विनंती करण्यात येते की कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी गाडी सुटण्याच्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही रेल्वे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Railway | मध्य रेल्वे मालामाल ! मालवाहतुकीतून तब्बल ७७१ कोटींची कमाई