Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : मित्राला मारहाण का करता असे विचारले असता तू मध्ये पडू नको टिपू पठाणचा मी नंबरकारी आहे. मला हडपसरचा भाई संतोष इसावे म्हणतात, असे म्हणून दोघांवर एकाने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ०१) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाजवळ घटना घडली आहे.
संतोष बाजीराव इसावे (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निखील सुदाम विरकर (वय २३, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिसात मंगळवारी (ता. ०९) फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील विरकर व त्यांचा मित्र कान्हा काळभोर हे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले होते. त्यावेळी बोलत असताना गणेश काळभोर हा तेथे पळत आला. आरोपी त्याला मारहाण करीत असल्याचे सांगून मला वाचवा, असे तो म्हणाला. कान्हा याने त्याला तुम्ही गणेशला का मारहाण करीत आहे.
अशी विचारणा केल्यावर त्याने तुला आमचे काय करायचे आहे़ तू आमच्यामध्ये पडू नको, नाही तर तुलासुद्धा सोडणार नाही़ अशी धमकी दिली. त्यावेळी विरकर यांनी त्याला तुम्ही त्याला मारु नका, आम्ही त्याला घरी सोडतो, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने व त्याच्या सोन्या साथीदाराने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली.
कान्हा हा मदतीला आल्यावर त्याने लय माज आला आहे. मी टिपू पठाणचा नंबरकारी आहे. मला हडपसरचा भाई संतोष विसावे म्हणतात, अशी धमकी देऊन त्याने साथीदार सोन्या याला यांना सोडायचे नाही, असे म्हणून जॅकेटमधून चाकू काढून फिर्यादी व कान्हा यांच्या गालावर, डाव्या बाजूला, गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर ते दोघे पळून गेले.
दरम्यान, दोघांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादी हे सोमवारपर्यंत उपचार घेत होते. कान्हा याला डॉक्टरांनी आराम करण्यास व जास्त न बोलण्याचा सल्ला दिल्याने तो तक्रार देण्यास गेला नाही. भिती कमी झाल्याने मंगळवारी (ता. ०९) तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!