लहू चव्हाण
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळातर्गत रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केले.
सोसायटी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पाचगणी विकास सेवा सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या राजपुरी या गावात बॅंकेच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात राजपुरे बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन शंकराव कंळबे,व्हा.चेअरमन शांताराम राजपुरे, संचालक आनंदा पार्टे,जाणू पांगारे,राजपुरी गावचे पोलीस पाटील अजय राजपुरे, दत्तात्रय राजपुरे, अशोक राजपुरे आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेंद्र राजपुरे म्हणाले की, या पुढील कालावधीत प्रत्येक गावात जाऊन सोसायटी आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून बॅंकेच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने संचालक मंडळ कटिबद्ध आहे.
तरुणांनी शेती पूरक व्यवसायाकडे वळावे शेतीला जोडव्यवसायासह शेती फायद्याची ठरणार आहे.
यावेळी पाचगणी विकास सेवा सोसायटीचे सर्व संचालकांनी गावात जाऊन सभासदांच्या कर्जा विषयी व विविध योजनांविषयी चर्चा करून सभासदांना चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच बॅंकेच्या माध्यमातून कृषी पर्यटन, स्ट्रॉबेरी पीक कर्ज, शेती पूरक व्यवसाय कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील महामंडळातर्गत बॅंक सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.