Shikrapur Crime | शिरूर : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा पिडीत विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात युवकावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनीच्या अचानक पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी पिडीत विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावेळी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना हादरा बसला.
दरम्यान, पिडीत विद्यार्थिनीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थिनीच्या आईसह अन्य नातेवाईकांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता, घरा शेजारील राहणाऱ्या एका तरुणाने दुकानातून घरी जाताना पिडीतेला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. आणि जर या संदर्भात कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. असे विद्यार्थिनीने आईला सांगितले.
त्यानंतर पिडीत विद्यार्थिनीच्या आईने तत्काळ शिक्रापूर पोलीस ठाणे गाठले. अज्ञात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात तरुणावर बाल लैंगिक अत्याचारसह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!