पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर तर आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या शिरूर दौऱ्यावर १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान येणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भगडे यांनी दिली आहे.
भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. १४४ मतदारसंघांपैकी, भाजपने महाराष्ट्रातील १६ लोकसभेच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी दोन जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत. या मोहिमेसाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती तर आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांना ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त केले आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. तर बारामतीच्या मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आहेत. भाजपच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत.
डॉ. निर्मला सीतारामन १५ ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये दाखल होतील. सीतारामन या खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. धायरी येथील एका मंगल कार्यालयात त्या खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. यामुळे भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.