राहुलकुमार अवचट
यवत : यवत ग्रामपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरात सोलापूर येथील व्यक्तीचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. मयताने दारू पियुन शिवीगाळ केली व कानाखाली चापट मारली म्हणून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
राजबहादुर बालुसिंग ठाकुर उर्फ राजु सारखी (वय-४७ रा. यवत ता. दौंड, जि. पुणे मुळ रा.पहाडीपुर नेपाळ) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर संजय सखाराम बनकर (रा. तांबेवाडी खामगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती महादेव मंदीराजवळ चिंचनगर, सोलापुर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत ग्रामपंचायत हद्दीतील पालखीस्थळ परिसरात बुधवारी (२७ जुलै) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला होता. सदर खुनाचा यवत पोलीस शोध घेत असताना कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे खुनाचे गूढ उलगडणे हे पोलिसांसमोर मोठे ध्येय होते. त्यानुसार अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांनी चार टिम तयार केल्या होत्या.
पोलीस निरीक्षक नारायण पवार व डी. बी. पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. तसेच आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी आहे व तो नेपाळला जाणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री दौड रेल्वे स्टेशन येथुन खुनाच्या गुन्हयातील आरोपी राजबहादुर सारखी यास नेपाळला पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याचायाकडे चौकशी केली असता मयताने दारू पियुन शिवीगाळ केली व कानाखाली चापट मारली म्हणून त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने आरोपीला गुरुवार (ता. ११) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास नारायण पवार पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, मारुती बाराते तसेच स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले यांचे पथकाने केली आहे.