Political | पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोध पक्ष नेते अजित पवार हे सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. अजित पवारांनी केलेल्या एका एका वाक्यावर आता बातमी होत आहे. तसेच राजकारण रंगत आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा अजून काही थांबण्याचे नाव घेईनात. असे असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री आता लगेच होयला आवडेल असे वक्तव्य केल्याने पुन्हा त्यावर राजकीय चर्चा होत आहेत. त्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अवघ्या महाराष्ट्राला संभ्रमात टाकतात. पण, या वेळी अजित पवार यांनी स्वत: शरद पवार यांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्याच मनाचा तळ लागत नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. यावर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण ? असा प्रश्न विखे पाटील यांना विचारण्यात आला.
त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, ” राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच चांगले नेते आहेत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे उत्तर दिले. त्यामुळे खरा मुख्यमंत्री कोण ? या चर्चेला आता उधान आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात असल्याने मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
भाजपाकडुन याआधीही चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाली आहे. अद्याप शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार…
राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही भाजपाकडुन मात्र सातत्याने आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून शिंदेंची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकीय घमासान सुरु असताना भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस यांच्याकडेच या सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. याचदरम्यान, भाजपच्या नेत्याकडून मुख्यमंत्रीपदावरुन सातत्याने विधाने केली जात आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पण यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वाढली आहे.