Breaking | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास अघाडीमध्ये तसेच पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. या सोबतच ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. मात्र जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
मुंबई विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरांमधील नेत्यांच्या यादीत अजित पवारांचे नाव नव्हते. त्यावरुनही चांगलेच राजकारण तापले होते. आता पुन्हा एकदा महत्वाच्या यादीतून नाव वगळल्याने ते केंद्रस्थानी आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर्नाटकात काही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष पदाचा दर्जा गेला, त्यामुळे पक्षाचे मूळ चिन्ह असलेल्या घड्याळावर इतर राज्यांमध्ये लढण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर आता ही निवडणूकही घड्याळाच्या चिन्हावर लढण्यात येत आहे.
राष्ट्रवादीने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव गर्जे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे, मात्र या यादीतून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतूनच अजित पवारांना मोठा धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.