Firing | पुणे : मौजमजा, मस्ती म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या चांगले अंगलट आले. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तेजस गोंधळे (वय २९, रा. तेजदीप निवास, गोंधळेनगर, हडपसर), अजिंक्य मोडक (वय ३४, रा. फुरसुंगी), चेतन मोरे (वय २४, रा. तुकाई दर्शन) यांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरायला गेले होते. तेथून परतत असताना तिघे जण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ थांबले. तेथे पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज परिसरातील उपहारगृहचालक आणि नागरिकांनी ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरु…
गोंधळे, मोडक, मोरे मोटारीतून निघून गेले. परिसरातील नागरिकांनी वाहनांचा क्रमांक टिपून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा पिस्तूल बाळगणारा तेजस याच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी शस्त्र परवान्याबाबत सखोल चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करुन दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असूनपोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते याबाबत अधिक तपास करत आहेत.