Khed News | खेड, (पुणे) : लग्नकार्य आटोपल्यानंतर पायवाटेने घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने ६ वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
आराध्या बाळू मेमाणे (वय ६, रा. आंबेगाव) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील बाळू मेमाणे आपल्या कुटुंबासमवेत लग्नासाठी नायफड (ता. खेड) येथे गेले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर पायवाटेने घरी निघाले होते. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांची मुलगी आराध्या हिच्यावर हल्ला केला. मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तिथून पळून गेला. जखमी झालेल्या मुलीला तातडीने तळेघर येथील आरोग्य केंद्रात आणले परंतु गंभीर जखम असल्याने तिला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे…
घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी रुग्णालयात जाऊन मुलीची विचारपूस केली. यावेळी तळेघरच्या वनपाल सुवर्णा जगताप व तेरुंगणचे वनरक्षक बी. डी. पटेकर यांचे सहकार्य लाभले. वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड व आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्यांच्या वावर वाढला असून यापूर्वी खेड तालुक्यातील पश्चिम भागात दोन घटना घडलेल्या आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी टोकावडे (ता. खेड) भागात भर दिवसा रानात बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या आदिवासी भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.