Ambedkar Jayanti 2023 | पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यात पाच हजार किलो मिसळ आणि एक लाख नागरिकांसाठी ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने एकूण तब्बल दहा हजार किलो मिसळ वाटप करण्यात आले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ आणि ताक तयार केले.
शुक्रवारी पहाटे तीन पासून मिसळ व ताक करण्याकरिता तयारी सुरु…
पालक मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रमुखांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर एका कढईत संपूर्ण मिसळ व दुसऱ्या भव्य कढईत ताक तयार झाले. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ आणि एक लाख बंधू-भगिनींना ताकवाटप करण्यात आले.
उपक्रमामध्ये ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच ताक बनवण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात दही, मीठ, कोथिंबीर सह इतर साहित्य वापरण्यात आले.