(Fraud) पुणे : दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने डॉक्टरासह ९ जणांची तब्बल १ कोटी ४७ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमरान खान (वय-३५, रा. रिव्हरडेल सोसायटी, थिटेनगर, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलूंड पूर्व मुंबई येथील डॉ.पराग केमकर या डॉक्टरांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मे २०२२ नंतर साकोरेनगर विमाननगर येथील बीट्स कॉईन व ब्लू पिक कंपनीच्या कार्यालयात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपी इमरान खान याने बिट्स कॉइनमध्ये पैसे गुंतवल्यास १२ महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम तर ब्लू पिक मध्ये पैसे गुंतवल्यास गुंतवणूक केलेल्या महिन्याला १५ टक्के व्याज मिळेल, असे आमिष फिर्यादी व इतरांना दाखवले होते. त्यानंतर त्यांनी या योजनेत गुंतवणूक केली.
आरोपी इमरान खान याने सांगितल्यानुसार कोणालाच रक्कम मिळाली नाही. त्यामुळे फिर्यादी डॉ.पराग केमकर यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इमरान खा याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील न्युक्लेअस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी सुरु करुन अनेकांची फसवणूक करण्याचा प्रकार मागील महिन्यात घडला होता. कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोणाकोणाची कर्ज थकली त्याची माहिती त्याने डेटा व्हेंडरकडून मिळवली. अन् कर्ज टॉपअॅप करुन देतो, असे सांगत फसवणूक केली होती.