(Pimpri )पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जाज्ज्वल्य कार्याचे स्मरण आणि गौरव करण्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी आणि सरचिटणीस विजय फुगे यांनी दिली.
१२ एप्रिल रोजी ही यात्रा…!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी, दि. १२ एप्रिल रोजी ही यात्रा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता भोसरी चौकातून यात्रेला प्रारंभ होईल. भोसरी चौक- दिघी रोड- आळंदी रोड- मार्गे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे समारोप होईल. त्यानंतर प्रसिद्घ व्याख्याते नितीन आपटे यांचे व्याख्यान होणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. यासाठी भाजपातर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रांचे आयोजन केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय यात्रा काढण्यात येत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व सावरकरप्रेमी नागरिक या गौरव यात्रेत सहभागी होणार आहेत.
जाज्ज्वल्य देशभक्त, स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रीय समाजसुधारक, द्रष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक, अशा अनेकविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हाच या गौरव यात्रेचा हेतू आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.