Pune पुणे : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकाच्या लाभासाठी २०२२-२३ मध्ये संगणकीय सोडतीने जिल्ह्यातील ९४४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पूर्वसंमती दिलेल्यांपैकी शेततळ्याची कामे पूर्ण केलेल्या ४७ शेतकर्यांच्या बँक खात्यावर २८ लाख ७३ हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.
जिल्ह्याकरिता वैयक्तिक शेततळे घटकासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ७ कोटी ८० लाख रुपये रकमेचा आर्थिक लक्षांक देण्यात आलेला होता. या योजनेंतर्गत शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देय आहे. वैयक्तिक शेततळे घटकांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून १ हजार ६४७ शेतकर्यांनी अर्ज केले आहेत.
त्यापैकी ऑनलाइन लॉटरीमध्ये ९४४ शेतकर्यांची निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत २१६ लाभार्थींना ऑनलाईनाला पूर्वसंमती दिली आहे. त्यापैकी ४७ लाभार्थींनी ३१ मार्चपूर्वी शेततळ्याची कामे पूर्ण केलेली असल्याने त्यांना अनुदान वितरीत करण्यात आले.
अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा….!
लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकर्यांना मोबाईल एसएमएसद्वारे संदेश प्राप्त होतो. त्यानुसार त्यांनी जमिनीचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला आदी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. ही कागदपत्रे तपासून तालुका कृषी अधिकारी या शेतकर्यास ऑनलाईन पूर्वसंमती देतात.
पूर्वसंमती दिल्यानंतर शेततळे खोदाईबाबत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकर्याने शेततळ्याचे काम पूर्ण करून काम पूर्णत्वाचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी शेततळ्याची तपासणी करून अनुदान परिगणना केल्यानुसार शेतकर्याला जिल्हास्तरावरून पीएफएमएस प्रणालीद्वारे अनुदान वितरीत केले जाते.