सागर जगदाळे
(Bhigwan Crime) भिगवण : नागरिकांना गोड बोलून फसवणूक करीत एटीएम कार्ड अदालबदल करुन लाखोंना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भिगवण पोलीसांनी पर्दाफाश करत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि विविध बँकांची तब्बल ५१ एटीएम कार्ड जप्त केले आहेत.
हमद इस्तियाक अली (वय.२७), जैनुल जफरल हसन, (वय.२८) इरफान रमजान अली, (वय.१९) (सर्वजण रा.उत्तरप्रदेश ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार….!
१६ मार्च २०२३ रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास भिगवण पोलीस ठाण्यातील हद्दीत हिताची कंपनीच्या एटीएममध्ये हेमंत गोफणे पैसे काढण्यासाठी गेले होते. एका अनोळखी इसमाने त्यांना मी पैसे काढून देतो असे सांगून एटीएम कार्डचा पासवर्ड माहीती करून घेत हातचलाखी करत स्वतः जवळील बनावट एटीएम कार्ड गोफणे यांना दिले. त्यानंतर या टोळीने एटीएम कार्डव्दारे गोफणे यांच्या बँक खात्यातून १ लाख ३० हजार ३०० रूपये काढून घेतले. याप्रकरणी गोफणे यांच्या फिर्यादीवरुन भिगवण पोलिसात अज्ञाताविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भिगवण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एटीएममधील कॅमेरे, टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध लावत, आरोपींना मुंबई, ठाणे भागातून अटक केली. कसून तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपींकडून १ लाख ३० हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक MH.03 BC 6386 यासह विविध बँकांचे तब्बल ५१ एटीएम कार्ड असा एकूण ५ लाख १० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक तपास पोलीस अमलदार महेश उगले करीत आहेत.