(Solapur Crime) सोलापूर : मुलगी झाली म्हणून नवऱ्याने पत्नीवर चाकूने वार केले. तर एवढ्यावरच न थांबता सासू अन् नणंदेने विवाहितेला दोन्ही हाताला कापराचे चटके दिल्याची धक्कादायक घटना तारापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे रविवारी (ता.२) सकाळच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सोलापुरात उपचार सुरु आहेत.
सासरकडील मंडळींच्याविरोधात गुन्हा दाखल…!
रेश्मा मारुती शिंदे (वय- ३५, रा. तारापूर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सोलापूरच्या सिव्हील चौकीत सासरकडील मंडळींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
रेश्मा यांना रविवारी सकाळी पती मारुती शिंदे याने मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात पायावर चाकूने वार करुन जखमी केले. सासू, नणंद आणि पतीने मिळून काठीने आणि कापराचे चटके देऊन दोन्ही हातांना जखम केली. यामध्ये रेश्मा जखमी झाली.
रेश्माचे नातलग जय धोत्रे यांनी रेश्माला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रविवारी सायंकाळी दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.