Baramati Crime | बारामती, (पुणे) : मानवाधिकार संघटनेची धमकी देत एका सामान्य मजुराला २ लाख ६५ हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नवनाथ सोमनाथ माने यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीन हंबीर शेख (रा. स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी शेख हा ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेशी सबंधित आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो. बारामती शहरामध्ये आपल्याला स्वत:ला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचा अमीन हंबीर शेख याला धनादेशाद्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात २ लाख ६५ हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले.
त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, माने यांना संघटनेची भीती घालण्यात आली. पोलिसांनी देखील शेख याला दोन वेळा नवनाथ माने या गरीबाचे पैसे देऊन टाका, अशी समज दिली. परंतु दोन-तीन महिने होऊन सुद्धा शेख याने टोलवाटोलवी केली.
दरम्यान, फिर्यादी नवनाथ माने यांनी शेख याला समक्ष भेटून पैसे देण्याबाबत विनंती केली. मात्र शेख याने माने यांना जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा संघटनेची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी शेख याच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!