विशाल कदम
Pune Police Recruitment | लोणी काळभोर : पोलीस बनायच स्वप्न उराशी बाळगून ७ हजारहून अधिक उमेदवार पोलीस भरतीची लेखी परीक्षा देण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता.१) दाखल झाले. परंतु, या विद्यार्थ्यांची व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती. त्यामुळे या सोयी सुविधांच्या अभावी विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल झाले आहेत.
महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची पद भरती सुरु आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस भरती २०२१ च्या ५७६ पोलीस शिपायांच्या जागांच्या भरतीची आज रविवारी (ता.२) लेखी परीक्षा होती. सकाळी १० ते ११.३० यावेळेत लेखी परीक्षा होणार होती. या लेखी परीक्षेसाठी लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील परीक्षा केंद्र नेमण्यात आले होते.
केंद्रावर सुमारे ७ हजारहून अधिक उमेदवार …
परीक्षेला कोणत्याही परिस्थितीत उशीर होऊ नये म्हणूव विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) दाखल झाले. या केंद्रावर सुमारे ७ हजारहून मुले व मुली त्यांच्या पालकांसह आले होते.या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालक आदल्या दिवशी येतील अशी माहिती असताना देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती. तर सुरक्षेचे कारण देत विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना गेटबाहेरच अडवले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, रेल्वे पुलाखाली रात्र काढावी लागली.
दरम्यान, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन कार्यालयात २०० ते २५० मुलींची राहण्याची सोय केली. लोणी काळभोर ग्रामपंचायतीची दोन कार्यालये मोकळी करुन ५०० मुलांची राहण्याची सोय केली. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने पालखीस्थळ येथे अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली. अशा प्रकारे पोलीस भरतीची लेखी परीक्षा देण्यासाठी आलेल्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील ५७६ रिक्त पोलीस शिपायी पद भरती प्रक्रिया सुरु आहे. शारिरीक चाचणी नंतर आता लेखी परीक्षा घेण्यात आली.रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली असून राज्यातून लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर ६८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये २ हजार ५०० विद्यार्थिनी तर ४३०० विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांची मोठी संख्या असल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील २५० अधिकारी आणि ७५० कर्मचारी तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रवेश देण्यात आला. परीक्षेचा लेखी पेपर १०० गुणांचा होता. विद्यार्थ्यांनी सकाळी दहा ते साडेअकरा या कालावधीत परीक्षा दिली.
पेपर संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या माध्यमातून उमेदवारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर या परीक्षा केंद्रावर कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलावे यांनी भेट दिली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी…
लोणी काळभोर येथील पोलीस भरती परीक्षा केंद्रावर उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेचा पेपर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर उमेदवार आपापल्या परीने घरी लवकर जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी भरलेल्या बस पुण्याकडे आणि सोलापूरच्या दिशेकडे चाललेल्या होत्या. विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे विद्यार्थी एका पायावर तसेच बसच्या दरवाज्यावर लटकत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हि गर्दी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कमी झाली. यावेळी लोणी काळभोर पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News | पिरंगुटच्या संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये;ग्रॅज्युएशन डे ; उत्साहात साजरा