(Sanjay Raut) पुणे : बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस दलात वेगाने तपास चक्र फिरत आहे. पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने खराडीतील चंदननगर भागातून एका तरुणाला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे.
राहुल तळेकर (वय २३, रा. चंदननगर) असे या तरुणाचे नाव आहे. खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर एके ४७ ने उडवून टाकू अशी धमकी देणारा मेसेज राऊत यांना आला आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते.
पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन…!
संजय राऊत यांच्याकडे याबाबत पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन मोबाईल क्रमांक कळविला. पोलिसांनी काल रात्री चंदननगर परिसरातून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले. तो एका हॉटेलमध्ये काम करतो. पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे. राहुल तळेकर याने राऊत यांना असे मेसेज का केले, त्याला असे मेसेज करायला कोणी सांगितले का याबाबत अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.