(Pune) पुणे : ऱिक्षाने देवदर्शनासाठी चाललेल्या कुटुंबावर अचानक रानडुकरांनी रिक्षावर हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षा तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळली. यात एक जण ठार तर 3 जखमी झाला आहे. पानशेतजवळील कादवे खिंडीत गुरुवारी (दि. २३) रात्री बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
भागुजी धाऊ मरगळे (वय ६०, सध्या रा. नसरापूर, मूळ रा. शिरकोली, ता. वेल्हे) असे मृत भाविकाचे नाव आहे. पांडुरंग धाऊ मरगळे (वय ४५, रा. शिरकोली, सध्या रा. डोणजे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिक्षाचालक सुरेश कोंडीवा ढेबे (रा. पोळे) व अशोक बबन मरगळे (वय ३१, रा. शिरकोली) अशी इतर दोन जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
वेल्हे तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वरघड येथील जोगोबा देवाच्या दर्शनासाठी हे कुटुंब चालले होते. यावेळी त्यांच्या रिक्षावर उन्मत रानडुकरांनी अचानक हल्ला केला. यात रिक्षा 300 फूट दरीत कोसळली. यात काकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. कुटुंबातील अन्य दोन सदस्य जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, मारूती मरगळे, सुनिल मरगळे, नितीन ढेबे, संतोष साळेकर यांनी खोल दरीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. मयत आणि जखमींना वनविभागाने मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती मरगळे आणि स्थानिकांनी केली आहे.