Uruli Kanchan | लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) ( Uruli Kanchan )येथील निसर्गोपचार आश्रमाचा ७७ वा वर्धापन दिन गुरुवारी (ता.२३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशी माहिती आश्रमाचे वैद्यकीय संचालक तथा सचिव डॉ. अभिषेक देवीकर यांनी दिली आहे.
उरुळी कांचन येथील या निसर्गोपचार आश्रमाची सुरुवात महात्मा गांधी, पद्मश्री डॉ मणिभाई देसाई, पोज्या बाळकोबा भावे आणि इतरांनी मिळून सन १९४६ मध्ये केली होती. यावर्षी आश्रमाचा यंदाचा ७७ वा वर्धापन दिन आहे. या वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पोषण शिबिरे आणि गरजू आणि गरीबांना अनुदानित आणि मोफत उपचार असे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी प्रसिद्ध बासरीवादक श्री बिक्रमजीत सिंग, तालवादक प्रेम मूर्ती, गिटारवादक विनेश रामचंद्रन, अबोशकर पटेल, नादब्रह्म बँडमधील वासू तनेजा, अरुणिमा नंदा, रुचिला आणि इतरांनी गांधीजींची आवडती भजने आणि शास्त्रीय राग वाजवले. ज्याचा उरुळीकांचनमधील साधक आणि रहिवाशांनी मनापासून आनंद घेतला.
यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ नारायण हेगडे, विश्वस्त माऊली कांचन, गिरीश सोहनी, आश्रमाचे व्यवस्थापक प्रवीण कुंभार, सीएमओ डॉ अमेय देवीकर डॉ कुशाण शहा, सहाय्यक प्रशासक सतीश सोनवणे (ममदापूर), यांच्यासह आश्रमाचे कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर चौधरी यांनी केले.
या निसर्गोपचार आश्रमात गांधीजी आठ दिवस राहिले…
उरुळी कांचन येथील या निसर्गोपचार आश्रमात गांधीजी आठ दिवस या आश्रमात राहिले असताना त्यांनी याठिकाणी विविध प्रकारच्या नैसर्गिक उपचार पद्धतींचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्याचा पायंडा पाडला. आज बहुतांश रोगांवर, आजारांवर प्रभावीपणे नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करणारी ही एक अग्रणी संस्था समजली जाते. दर वर्षी १० हजारांहून अधिक रुग्णांवर याठिकाणी उपचार केले जातात. एका वेळेस २०० रुग्णांवर उपचार होऊ शकतील, एवढी या उपचार केंद्राची क्षमता आहे.
आहार, योगा व्यायामपद्धती, मसाज, स्टीम बाथ, जलोपचार, अॅक्युप्रेशर यांसारख्या उपचार पद्धती वापरून स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, मायग्रेन आणि तणावग्रस्त आजारांवर आश्रमात प्रभावीपणे उपचार केले जातात. याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात आहाराचे महत्त्व, तणावापासून मुक्तता मिळवण्याची माहिती या विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी योगा व निसर्गोपचाराचे प्रशिक्षण वर्गही घेतले जातात. तसेच महिलांसाठी खास योगा, मसाज प्रशिक्षण अभ्यासक्रम, योग प्रशिक्षक अभ्यासक्रम, पारंपरिक आरोग्य अभ्यासकांचे प्रशिक्षण असे विविध बहुआयामी कार्यक्रम राबवले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP