युनूस तांबोळी
Weather News | पुणे : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस ( Weather )होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती त्यानुसार पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात गारपीट झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ढगाळ वातावरण असून हवामानाच्या बदलाने आरोग्यावर परीणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.
ही शक्यता शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात खरी ठरली आहे. शिरूरच्या पश्चिम भागात ( ता. १८ ) सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान केले. विजांचा कडकडाट, गारांचा मारा व पाऊस यात शेतात उभी असलेली कांदा, मका, गहू, हरभरा,तरकारी पिके ऊस व इतर पिकांचे मोठेच नुकसान झाले. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
सायंकाळी आलेल्या या जोरदार वादळी पावसाने कवठे येमाई येथील साईनगर, गांजेवाडी, हिलाल मळा, रोहिलेवाडी परिसरातील शेतीला मोठाच दणका बसला. एकीकडे गारांचा वर्षाव व दुसरीकडे जोरदार वारे व पाऊस यात काढणीस आलेली कांदा पिके, गहू पिके, हरभरा इत्यादींना मोठाच फटका बसला शेतीसाठी सातत्याने कर्ज काढून जीवापाड कष्ट करून शेतीतून उत्पन्न काढू पाहणाऱ्या व आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या गारपिटीने आणखीनच मोठा आर्थिक झटका बसला आहे.
गारपीट व वादळी पावसाने शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी व पंचनामे करण्यासाठी नायब तहसीलदार शिरूर, मंडलाधिकारी मलठण व संबंधितांना तात्काळ सूचना करण्यात येत आहे. शासन नियमानुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळणे कामी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील.
बालाजी सोमवंशी, तहसीलदार, शिरूर
मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट…
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटामुळे केळी, गहू आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा कोकणमधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागात पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव याभागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या शक्यतेनुसार वरील जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्यांना देण्याची मागणी होत आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचार्यांचे संप सुरु आहे. या संपामुळे मागील आठवड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. त्यात नव्याने नुकसान झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा सवाल केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
राज्यात वादळी पावसाचा इशारा ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज..!