Sangli Crime | सांगली : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजप नगरसेवकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. वाहनावर गोळीबार झाला असून नंतर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजय ताड असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या मालमत्तेच्या वादावरुन झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या…
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक विजय ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये जागीच गतप्राण झाले.
दरम्यान, या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे मात्र समजू शकलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
आरोपी ज्या दिशेने गेले, त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. आरोपींनी ताड यांच्या गाडीवर आधी गोळीबार केला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली आहे.