(Shirur Crime News) शिरूर : तालुक्यातील पश्चिम भागात चोरीचे प्रमाण वाढले असून वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तातडीने चोरीच्या घटनेचा छडा लावावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वडनेर खुर्द येथून एकाच वेळी दहा शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल आणि पॅनल बॉक्स चोरी गेले आहेत. चोरीचे एकामागून एक प्रकार घडत असल्याने या परिसरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
वाहनाच्या बॅटरीवर डल्ला…!
या भागात चोऱ्या वारंवार घडत आहे. याच आठवड्यात चोरट्यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच लावलेल्या शववाहिनी (स्वर्ग रथ) वाहनाच्या बॅटरीवर डल्ला मारला आहे. कवठे येमाई हद्दीतील घोडनदी वरील प्रताप जाधव यांचा पाच एच पी चा कृषी पंप चोरुन नेला आहे.
यापूर्वी या वर्षभरात विद्युत पंप, केबल, ठिबक संच, कृषिची दुकाने, घरफोडी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. घरफोडीमध्ये शासकीय सेवेतील दोन निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरफोडीचाही समावेश आहे. त्यामुळे चार महिने उलटूनही या साऱ्या घटनांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांना वेळोवेळी बंदोबस्तासाठी बाहेर जावे लागते. यामुळे वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचा तपास करण्यास पाहिजे तितका वेळ पोलिसांना मिळत नाही, असेही कारण पोलिसांकडून दिले जाते. कधी कधी तक्रार देण्यासाठी तक्रारदारांना टाकळी हाजी दुरक्षेत्र येथे कर्मचारी नसल्याने शिरूरला जावे लागते. अनेक चोरीच्या घटना घडूनही तपास न लागल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन!