उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगावमूळ (ता. हवेली) येथील इनामदारवस्ती वरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जागा खाजगी मालकीची निघाल्याने या जागा मालकाने जागेचा ताबा घेतल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षणासाठी जागेअभावी बेघर झालेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून दान स्वरूपात दिलेली जागेत जिल्हा परिषद शाळेचा पाया पुजला गेल्याने ग्रामस्थ आणि नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरेगावमूळ येथील इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेअभावी गेली दोन वर्षे जागेअभावी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाऊस, ऊन वाऱ्यात हे विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवस्था पाहता, या ठिकाणी शाळेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या आवस्थेचा स्थानिक नर्सरी व्यावसायिक संतोष शितोळे हे धावून येत, त्यांनी स्वमालकीची पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगची ७० ते ७५ लाख किमतीची जागा शाळेला देऊ केली आहे. स्वखर्चातून ही जागा बक्षीस पत्राने ग्रामपंचायतीला देऊ केल्याने या ठिकाणी जिल्हा परिषदेचा १९ लाख रुपये वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर झाला आहे.
या कामाचे भूमिपूजन शुक्रवार( दि.१०) रोजी करण्यात आले आहे. उपसरपंच वैशाली अमित इनामदार व अमित सावंत इनामदार यांच्या हस्ते पूजा करुन भूमिपूजनाचा पाया पुजला आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वैशाली सावंत इनामदार, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी नाजीरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे, महेंद्र शितोळे, धनंजय शितोळे, शालेय समितीचे अध्यक्ष धनंजय शिंदे, सोपानराव शितोळे, केंद्रप्रमुख महेंद्र मोरे, विस्तार अधिकारी शब्बीर शेख, मुखायाध्यापिका पुष्पलता गायकवाड, नजमा तांबोळी, सचिन साळुंके, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शाळेच्या कामाचा शुभारंभ झाल्याने या ठिकाणी गोरगरीब तसेच परप्रांतीय गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. सुमारे ७० विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यासाठी या शाळेचा प्रयत्न सफल होणार आहे. याकामासाठी उद्योजक संतोष शितोळे हे धावून आल्याने त्यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, इनामदार वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला तीन खोल्यांची मंजुरी मिळाली असून या कामासाठी १९ लाख ५१ हजार रुपयांचा फंड मिळाला आहे. तर लोकवर्गणीतून आणखी २० लाख रुपये गरज आहे. त्यासाठी इनामदार वस्ती व कोरेगाव मूळ परिसरातील नागरिकांच्या मदतीने सर्व काम करण्यात येणार आहे.