Ajit Pawar News : पुणे : नापिकी, शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागत आहे, त्यातच अवकाळी पावसाने राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावात दोन शेतकरी आत्महत्या करतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. लाखाचा पोशिंदा असणारा शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य चालत, शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा या सभागृहात दुसर मोठ काहीही नाही, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा घणाघाती आरोप करत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. (Opposition leader Ajit Pawar surrounded Shinde-Fadnavis)
अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना घेरलं
राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. नाफेडकडून खरेदी सुरु असल्याची माहिती सरकार सांगत आहे, मात्र फिल्डवरची स्थिती वेगळी आहे. अजूनही कांदा, हरबरा खरेदी सुरु नाही. सरकार सभागृहाची दिशाभूल करत आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे एक लाख एकर क्षेत्र बाधित झालेले आहे.
कापणीला आलेले पीक वाया गेलं आहे. राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या मतदार संघात एकाच गावातले दोन शेतकरी आत्महत्या करतात ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शेतकर्यांच्या जीवावर हे सरकार चाललं आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय…याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने सभागृहात मांडला मात्र तो नाकारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, महिला दिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती, मात्र ती केलीच नाही यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चालले आहे. शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे. असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांना केला. दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष चर्चा करायला तयार नसल्याने महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.