(वैशाली चव्हाण, अध्यक्ष तेजस्वीनी फाऊंडेशन, शिरूर)
“ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली,
तो जिजाऊचा शिवबा झाला.
ज्याला स्त्री ‘बहिण म्हणून कळली,
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला.
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला,
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला …!
प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम स्मरणात ठेवून पुजले पाहिजे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्य महान आहे. त्यामुळे स्त्री ही काय होऊ शकते. हे आपल्याला इतिहासाने दाखवून दिले आहे. आजच्या युगात ‘स्त्री’ला महत्व दिले जाऊ लागले, असले तरी समाजात आजही ‘ती’च्या जन्माबाबत अनेक पंरपरा व नकोशीपणा पाहावयास मिळतो.
8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा होत आहे. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा,अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच…. कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.
पण हे करत असताना खरे तर महिलांचा समाजात सन्मान होतो का? हा अभ्यासाचा विषय आहे. नोकरवर्गात या बाबत अनेक वेळा उदासीनता दिसून येते. कामाच्या वेळा व तिला मिळाणारी सुविधा याबाबत अनेक वेळा तीला झगडावे लागते.
पोलिस खात्यात अनेक वेळा या बाबत शासन निर्दशनास आणून दिले गेले त्यावेळी महिलांच्या कामाच्या वेळेत बदल झालेला पहावयास मिळतो. प्रसुती पूर्व सक्तीची रजा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीत लढत दिल्यावर सहा महिणन्याची रजा मिळू लागली. महिलांना संघर्ष करावाच लागतो आहे.
महिलांच्या बाबतीत आजही सुरक्षीततेचा प्रश्न गंभीर आहे. होणार छळ याकडे कोणी लक्ष देण्याची गरज आहे. प्रेम विवाह व त्यातून होणारे घटस्पोट याची संख्या सगळ्यात जास्त असून वयाच्या ३० व्या वर्षी घडत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे स्त्री- पुरूष प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे विवाहासाठी मुली मिळत नाही. हे वास्तव आहे. त्यामुळे प्रबोधनातून मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन ”बेटी बचावो”चा नारा सत्यात उतरवला पाहिजे. स्त्री म्हणजे वात्सल्य,स्त्री म्हणजे मांगल्य,स्त्री म्हणजे मातृत्व,स्त्री म्हणजे कर्तृत्व…हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
( शब्दांकन : युनूस तांबोळी )