दीपक खिलारे
इंदापूर : आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आपल्या कर्तृत्वाने पुढे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी केले. जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनानंतर अंकिता पाटील-ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘केवळ 8 मार्चला महिलांना सन्मान न राहता वर्षाच्या 365 दिवसांमध्ये महिलांना आदर मिळायला हवा. महिलांना कलाक्षेत्रात उत्तुंग करिअरच्या संधी आहेत. महिला खंबीर, सदृढ व बलशाली हवी. स्वयंपूर्णतेकडे महिलांचा कल असावा. लघु उद्योगातही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी त्या क्षेत्राला अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक विशाल घोगरे व त्यांच्या टीमने यावेळी स्वसंरक्षणाचे धडे दिले तर,रूपाली काकडे ,शोभना टिके,पूजा शिंदे -ढमढेरे, रोमा साबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या गायकवाड, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, प्राध्यापिका मनीषा गायकवाड, प्राध्यापिका मृदुल कांबळे, डॉ. भरत भुजबळ, डाॅ.शिवाजी वीर, डॉ. संदीप शिंदे उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शितल पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती राऊत यांनी केले तर, आभार प्राध्यापिका कल्याणी देवकर यांनी मानले.