लहू चव्हाण
पाचगणी : आंब्रळ गाव हे शासनाच्या पाणी टंचाई आराखड्यात असून पिण्याच्या स्रोताजवळच दांडगाईने बोअर नसताना देखील खोटी नोंद करण्यात आली आहे. याच खोट्या नोंदीचा दाखला देऊन बोअर साफ करण्याची परवानगी मागून, बेकायदा बोअर मारण्याचा प्रयत्न महसूल विभागाने रोखावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली असून आंदोलनाचा तीव्र इशारा महाबळेश्वरचे तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ हे गाव पाणी टंचाई आराखड्यात येत असून गावात तीव्र पाणी समस्या आहेत. असे असताना काही धनाढ्य नागरिकांनी आपल्या सातबाऱ्यात बोअरवेल अस्तित्वात नसताना देखील त्याची नोंद करून घेतली आहे. त्याच दाखल्याचा आधार घेऊन ती व्यकती सदर बोअरवेर पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत असून प्रत्यक्षात अशी कोणतीच बोअरवेल नसल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे, त्यांनी निवेदनात मांडले आहे.
हा बोअरवेल मारला गेल्यास गावाच्या सार्वजनिक पाणी स्रोतांना मोठे नुकसान होणार आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतापासून ५०० मीटरच्या आत बोअरवेल घेता येत नाही. असे असून देखील काही धनाढ्य व्यक्ती शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून, बेकायदेशीर बोअरवेल घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यापूर्वी देखील गावातील एका इसमाने विहीर खोदण्याचा प्रयत्न केला असता, गावाने त्यावर खटला भरला असून त्या संदर्भात गावाची न्यायालयीन लढाई सुरु आहे.
या प्रकरणाची तक्रार गावाच्या वतीने महाबळेश्वरचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली असून ग्रामस्थांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. सबब कारवाई न केल्यास गावाच्या वतीने पाण्यासाठी आंदोलनाचे अस्त्र उचलावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी उपविभाग वाई यांनाही देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संतोष गणपत आंब्राळे , आनंदा आप्पा आबाळे, उमेश बबन जाधव, दिलीप हरिभाऊ आंब्राळे, तेजस आंब्राळे, विशाल जाधव, मारुती आंब्राळे, दत्तात्रय आंब्राळे, संतोष आंब्राळे, गणपत आंब्राळे, रवींद्र आंब्राळे, संजय आंब्राळे, प्रल्हाद आंब्राळे आदी ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.