पुणे : तळेगाव-चाकण महामार्गावर कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार ठोकर मारुन पायी चालत निघालेल्या तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव-चाकण महामार्गावर वडगाव फाट्याजवळ गुरुवारी (ता. ०२) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अपघात झालेले तिघे विद्यार्थी हे एका अभियांत्रिकी महाविद्यालयात होत असलेल्या बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यातील मयत हा तामिळनाडू राज्यातील असून त्यांची पूर्ण नावे अद्याप समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेले तिघे विद्यार्थी हे एका अभियांत्रिकी महाविद्यालयात होत असलेल्या बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. तळेगाव-चाकण महामार्गावर तिघेजण हि चालत महाविद्यालयात निघाले होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरीसमोर भरधाव कंटेनरने दुचाकीला ठोकर दिली.
तळेगाव-चाकण महामार्गावर दुचाकीस्वार मात्र अपघातात थोडक्यात बचावला मात्र या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून पायी चालत निघालेल्या तिघांना जोरदार धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गासह, तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, या अपघातानंतर कंटेनर हा रस्त्यावर आडवा होत विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगा-यावर जाऊन धडकला. अपघातानंतर चालक पळून गेला.तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या नेमक्या हद्दीवर झालेल्या या अपघाताची माहीती कळताच दोन्ही पोलीस ठाण्यांसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोहोचत कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.