लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणीचे वास्तुविशारद नितीन (भाई) भिलारे यांना ऑल इंडिया आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझाइन एक्सलन्स अवॉर्ड २०२२-२३ चा मोस्ट प्रॉमिसिंग उद्योजक आणि डिझायनर हा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट वास्तू विशारद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बेंगळुरू येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वास्तुविशारद पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या नितीन (भाई) भिलारे यांना हा पुरस्कार नवी दिल्ली एएनए डिझाईन स्टुडिओचे ए.आर. अमीन नय्यर,एच सी थिम्मय्या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बंगलोर फाउंटनहेड कृष्णराव जैसीम,प्रा. डॉ अजय चंद्रन सी के,दिया असरानी,प्रा.डॉ.विभूती सचदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन भिलारे यांचे तालुक्याच्या जडणघडणी मधील योगदान हे वाखाणण्याजोगे आहे. भिलारे गेल्या २३ वर्षापासून वास्तुविशारद या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचे कार्यकौशल्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व युवकांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. शहरातील वारसा स्थळांची जपणूक व्हावी यासाठी असणारी त्यांची तळमळ त्याचबरोबर निसर्गाला साजेशे आणि समरूप होणारे बांधकाम,पर्यटन, स्वच्छता, निसर्गाची जपणूक या क्षेत्रात त्यांनी वेगळी वाट निर्माण केली आहे.
त्यांच्या या जनहितार्थ कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना उत्कृष्ट वास्तू विशारद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे. नितीन भिलारे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर हा सन्मान मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.