पुणे : जुन्या वादाच्या कारणावरून खून केलेल्या दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायधीश डी. पी. रागीट यांच्या कोर्टाने दिले आहेत. आरोपीवर बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
अंड्या उर्फ प्रदीप सुविचंद घोडके व नट्या उर्फ नितीन मोहन म्हस्के अशी निर्दोष मुक्तता झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्या तर्फे अॅड विपुल दुशिंग व अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता.
ताडीवाला रोड वरील भीमटोला मित्रमंडळा जवळ ०५/०६/२०१५ साली जुन्या वादाच्या कारणावरून महेश वर्मा या युवकाचा ४ ते ५ लोकांनी मिळून खून केला होता. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. त्यानुसार ५ आरोपींपैकी ३ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची केस बाल न्यायालयात वर्ग झाली होती. तर आरोपी अंड्या उर्फ प्रदीप सुविचंद घोडके व नट्या उर्फ नितीन मोहन म्हस्के यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली होती.
सदर केस मध्ये सरकारी पक्षामार्फत एकूण ७ साक्षीदार तपासले गेले, त्यातील ४ साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी होते. आरोपींच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने तसेच केसमधील साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याने आरोपी याना निर्दोष सोडण्यात यावे, असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयापुढे केला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. २८) आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा न मिळण्यामुळे दोन्ही आरोपींना सदर केस मधून निर्दोष सोडण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, सदर केस मध्ये आरोपींतर्फे अॅड. विपुल दुशिंग, अॅड. नितीन भालेराव, अॅड. मयूर चौधरी यांनी काम पाहिले. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.