पुणे : आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी ससुन रुग्णालयात आणण्यात आले असता दोन टोळ्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२४) घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील शिकलकरी यांच्या दोन गटात शुक्रवारी (ता.२४) हाणामारी झाली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले.
त्यावेळी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी त्यांच्या बरोबर होते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) समोर दोन टोळ्यांमधील सराईत समोरासमोर आले. सराईतांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करुन कोयते उगारुन दहशत माजविली. ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराईतांना रोखण्याचा प्रयत्न केला. हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले.
पोलिसांनी या प्रकरणात दोन टोळ्यांमधील सराईतांना ताब्यात घेतले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.