पुणे : सावत्र आईने पाच वर्षीय मुलीला चटके देऊन डोक्यात मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना पुण्यातील शिवणे भागात घडली आहे. याप्रकरणी क्रूर सावत्र आईला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरूवारी (ता. २३) रोजी दुपारी घडली आहे.
श्वेता राजेश आनंद (वय. ५) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. रितीका राजेश आनंद (वय. ३६, रा. धावडे इमारत, शिवणे) असे अटक केलेल्या सावत्र आईचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राजेश आनंद हे एका खासगी ठिकाणी रोजंदारीने काम करतात. दुर्दैवाने नुकतेच त्यांच्या पत्नीचे मृत्यू झाला आहे. त्यांना श्वेता ही एकच मुलगी आहे. दरम्यान, त्यांची व आरोपी रितीका यांची ओळख झाली होती. त्यांनी पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांनी रितीकासोबत दुसरा विवाह केला.
त्यानंतर ते शिवणेमधील अहिरेगेट येथील एका रूममध्ये राहत होते. दरम्यान, श्वेता त्यांना त्रास देत होती. तिला सांभाळताना होणार्या त्रासाला कंटाळून रितीकाने तिला चटके दिले. तर, तिच्या डोक्यात मारून तसेच तिचे डोके खाली व कपाटावर आपटले. यात ती गंभीर जखमी झाली व बेशुद्ध पडली. रितीका हिने लागलीच श्वेताला ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
त्यांनी संशयास्पद वाटल्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. उत्तमनगर पोलिसांनी ससून रुग्णालय गाठत माहिती घेण्यास सुरूवात केली. रितीका हिच्याकडे सखोल चौकशी केली असता रितीका त्रास देत असल्यावरून मारल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल तिला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.