पुणे : जनतेच्या हितासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा नंबर अग्रस्थानी लागतो. ते नेहमीच सामान्य माणसांचे प्रश्न तातडीने कसे सोडविता येतील यासाठी प्रयत्नशील असतात. अनेकदा मदत करताना हा आपल्या मतदार संघातील आहे की नाही, याची तमा न बाळगता देखील मदत करत असल्याने जनमानसात त्यांची प्रतिमा अधिकच मोठी होत जात आहे.
३१ जानेवारी २०२३ ची मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर एक वृद्ध आजी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आल्या होत्या. त्यांना पेंशन मिळत नसल्याचे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. कोणती पेन्शन मिळत नाही, हे देखील त्या आजींना सांगता आले नाही. त्यांच्याकडे असलेल्या फोनचा नंबर देखील सांगता आला नाही.
साहेब आज मला पेंशन मिळालीच पाहिजे, असा त्या आजींचा आग्रह होता. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या आजोबांनी बोलताना सांगितले की, आजी आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांना भेटल्या आहेत, परंतु त्यांचे काम कुणीच केले नाही. त्यांच्याशी देवेन्द्रजी सुमारे १० मिनिट बोलत होते. शेवटी त्यांचा अर्ज सापडला.
सुनीता आष्टुक (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांचा अर्ज देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला व उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. सुनीता आष्टुक यांना संजय गांधी निराधार योजनेची पेंशन मंजूर झाल्याचे आज प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे की, या वृद्ध दिव्यांग दाम्पत्याची सेवा मला करता आली. शेवटच्या माणसाचा विकास हेच ध्येय ठेऊन राजकारणात काम करायचे असते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कार्य पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील अभिनंदन करताना सुनीता आष्टुक व त्यांच्यासमवेत आलेल्या आजोबांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.